लोकमान्य गीताबोधगीता स्वाध्याय · श्री गणेशोत्सव मंडळ, लोकमान्य आळी, ठाणे

गीता स्वाध्याय · श्री गणेशोत्सव मंडळ, लोकमान्य आळी, ठाणे
सभासद पालक आणि पाल्यांसाठी

लोकमान्य गीताबोध

लोकमान्यांचे गीतारहस्य, आजच्या जीवनाचा अर्थबोध

मंडालेच्या कोठडीत लिहिलेला विचार, आता आळीच्या घराघरांत. लोकमान्य टिळकांचा गणेशोत्सव आपण दरवर्षी साजरा करतो; आता त्यांनी गीतारहस्यात मांडलेला कर्मयोगाचा विचारही पालक आणि मुले एकत्र शिकतील. ऑनलाइन, महिन्यातून एक सत्र, पुढील काही वर्षे.

छत्राखाली उभे असलेले लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे शिल्प
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
  1. १८९३पुणे: टिळक गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप देतात
  2. १९०८मंडालेच्या तुरुंगात सहा वर्षांची शिक्षा सुरू
  3. १९१०–११कोठडीत गीतारहस्याचे लेखन
  4. १९१५गीतारहस्य ग्रंथरूपाने प्रकाशित
  5. १९२०श्री गणेशोत्सव मंडळ, लोकमान्य आळी, ठाणे यांची स्थापना
  6. २०२६लोकमान्य गीताबोध सुरू
  7. २०२७गणेशोत्सवात पहिली चर्चा-वादसभा

१९२० पासून आळीचा गणेशोत्सव

श्री गणेशोत्सव मंडळ, लोकमान्य आळी, ठाणे यांची स्थापना १९२० (शके १८४२) मध्ये झाली. आजपर्यंत आपण उत्सव करत आलो.

“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे” ही टिळकांची गर्जना आपल्या सगळ्यांना माहीत आहे. तो हक्क मिळवण्यामागचा जबाबदार कर्माचा विचार त्यांनी गीतारहस्यात मांडला, असे अनेक अभ्यासक मानतात. तोच विचार आता आळीच्या घरांत, पालक आणि मुलांसोबत शिकायचा आहे.

सार्वजनिक विश्वस्त निधी क्र. ए ३६ टी

दगडी भिंतीवर धातूच्या अक्षरांत: स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच! — लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
लोकमान्य टिळकांची गर्जना

गीतारहस्य: टिळकांनी कधी, का आणि काय लिहिले?

आपण जो विचार शिकणार आहोत, त्याचा जन्म कसा झाला ते आधी समजून घेऊ.

कधी
१९०८ मध्ये टिळकांना राजद्रोहाच्या आरोपावरून सहा वर्षांची शिक्षा झाली. तुरुंगवासात, साधारण १९१० ते १९११ या काळात त्यांनी ग्रंथ लिहिला. १९१४ मध्ये सुटका झाली आणि १९१५ मध्ये मराठीत तो प्रसिद्ध झाला.
कुठे
मंडालेच्या तुरुंगात (ब्रह्मदेश, आजचे म्यानमार). तुरुंगातही संस्कृत ग्रंथ, भाष्ये आणि पाश्चात्य नीतिशास्त्र यांचा सखोल अभ्यास करून त्यांनी हा ग्रंथ रचला.
का
पारंपरिक भाष्यांमध्ये गीतेचा अर्थ अनेकदा “संसार सोडा, संन्यास घ्या” असा लावला जाई. टिळकांचे म्हणणे होते की अर्जुनाला कर्तव्यापासून पळायला नाही, तर विचारपूर्वक कर्म करायला सांगितले आहे. म्हणून त्यांच्या मते गीता हे कर्मयोगशास्त्र आहे. निराशेत अडकलेल्या समाजाला जबाबदार कृतीकडे नेणारा हा विचार त्यांनी पुराव्यांसह मांडला.
ग्रंथाचे पूर्ण नाव
श्रीमद्भगवद्गीतारहस्य अथवा कर्मयोगशास्त्र

त्यात काय आहे?

  • गीतेचा गाभा कर्मयोग. ज्ञान आणि भक्ती यांचा आधार घेऊन, पण कर्म न सोडता जगण्याचा मार्ग.
  • निष्काम कर्म. फळाच्या हव्यासात न अडकता, पण कर्तव्यबुद्धी जागी ठेवून काम करणे.
  • स्थितप्रज्ञ आदर्श. सुखदुःखात समबुद्धी राखून व्यवहार करणारा माणूस.
  • तुलना. पाश्चात्य नीतिशास्त्रातील सुखवाद, सांख्य आणि वेदान्त या दर्शनांशी गीतेच्या शिकवणीची तपासणी.
  • बहिरंग परीक्षण. गीतेचा काळ आणि महाभारत, उपनिषदे यांच्याशी तिचे नाते.
  • मूळ श्लोकांचा मराठी अनुवाद आणि टीपा.

पंधरा प्रकरणांचा नकाशा

गीतेचे अध्याय १८, तर गीतारहस्याची प्रकरणे १५. आपण गीतेचे अध्याय क्रमाने शिकू आणि प्रत्येक सत्रात विषयाशी जुळणारे गीतारहस्यातील निवडक उतारे पाहू.

गणपती रस्त्यावर आणला, आता गीता घरात

टिळकांनी घरगुती गणपती सार्वजनिक केला, म्हणजे माणसे एकत्र यावीत, बोलावीत आणि एकत्र विचार करावा. त्या विचारांचा अभ्यास करून पालक आणि पाल्यांची एक विचारशील पिढी उभी राहावी, हा या उपक्रमाचा हेतू आहे.

उत्सव फक्त आनंदाचा नाही, तो विचाराचाही आहे.

हा उपक्रम बाहेरून कोणी येऊन घेत नाही. आपल्याच मंडळाचे दोन आजीव सभासद तो चालवणार आहेत.

पालक वर्ग

श्री. विवेक भास्कर साठे · मंडळाचे आजीव सभासद

जन्मभूमी ठाणे, कर्मभूमी सिंगापूर. यांत्रिकी अभियंता (College of Engineering, पुणे), Georgia Institute of Technology, Atlanta येथून Analytics मध्ये पदव्युत्तर शिक्षण; बँकेत कार्यरत. सिंगापूरमध्ये गीता स्वाध्यायाचा अभ्यासवर्ग घेतात आणि “माझा आजचा विचार” या मराठी ब्लॉगवर लिहितात. अधिक ओळख

  • श्लोकार्थ आणि गीतारहस्यातील निवडक उतारे
  • निर्णय, काम, नाती यांत गीता कशी वापरायची यावर चर्चा
  • घरात मुलांशी संवादासाठी सूत्रे

पाल्य वर्ग

सौ. मानसी निखिलेश गोडबोले · मंडळाच्या आजीव सभासद

पूर्वाश्रमीच्या कु. भारती भास्कर साठे. मूळच्या ठाण्याच्या; शालेय शिक्षण शिव समर्थ विद्यालय, ठाणे. मुंबई विद्यापीठातून M.Com (Advanced Accounting). डोंबिवली येथे बारावी कॉमर्सपर्यंत सर्व विषयांची शिकवणी घेतात आणि “माझा आजचा विचार” वर लेखन करतात. अधिक ओळख

  • श्लोकांचा सोप्या मराठीत अर्थ आणि गोष्टीरूप स्पष्टीकरण
  • शाळा, मित्र, अभ्यास यांतील प्रसंगांतून विचार
  • प्रश्नोत्तरे आणि वादसभेची तयारी
दोन्ही वर्ग वेगळेपालक आणि पाल्यांचे सत्र स्वतंत्र, कारण दोघांच्या भाषेत आणि प्रश्नांत फरक असतो.
उपस्थिती बंधनकारकपालक आणि पाल्य दोघांनी हजर राहायचे, म्हणजे घरात एकाच विषयावर संवाद होतो.
ऑनलाइन सत्रेZoom किंवा Google Meet वर. नोंदणी केलेल्यांना Google Classroom मध्ये घेतले जाईल.
gmail.com आवश्यकClassroom चे आमंत्रण याच पत्त्यावर येते.

प्रत्येक सत्राची रचना

  1. १

    लेक्चर

    मूळ श्लोकांचा मराठी अर्थ आणि गीतारहस्यातील निवडक उतार्‍यांचे संदर्भ.

  2. २

    जीवनाची चौकट

    आजच्या दैनंदिन निर्णयांचा आणि कामाचा विचार करण्यासाठी एक साचा.

  3. ३

    चर्चा आणि परीक्षा

    स्पष्टीकरण, चर्चा, प्रश्नोत्तरे आणि बहुपर्यायी परीक्षा.

  4. ४

    पुढील गणेशोत्सवाची तयारी

    गणेशोत्सवात होणार्‍या चर्चा-वादसभेची तयारी.

  • स्वाध्याय पुस्तिका
  • लेक्चरचे व्हिडिओ
  • बहुपर्यायी प्रश्नपत्रिका

पुढील वर्षांचा आराखडा

दर वर्षी दोन ते तीन अध्याय. वर्षभरात आठ ते दहा सत्रे, महिन्यातून एक. मोठे सण आणि शाळेच्या परीक्षा वगळून.

पहिल्या वर्षाचे सत्र-वेळापत्रक (२०२६–२७)

महिने तात्पुरते आहेत. दिवस, वेळ आणि अंतिम तारखा शाळांच्या दिनदर्शिकेनुसार Google Classroom मध्ये कळवल्या जातील.

    परीक्षा, प्रशस्तीपत्रक आणि २०२७ चा गणेशोत्सव

    वर्षाच्या शेवटी बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेची परीक्षा होईल. किमान ७०% उपस्थिती आणि परीक्षेत किमान ७०% गुण मिळवणाऱ्या प्रत्येक सहभागीला (वडील, आई आणि पाल्य) मंडळातर्फे स्वतंत्र “लोकमान्य गीताबोध” प्रशस्तीपत्रक दिले जाईल. ते हस्तांतरणीय नाही आणि त्यावर सहभागीचा नोंदणी क्रमांक असेल.

    तेच २०२७ च्या गणेशोत्सवात पहिल्या आणि दुसर्‍या अध्यायावरील चर्चा आणि वादविवाद सत्रात भाग घेतील.

    नाव नोंदवा

    सभासद पालकांनी स्वतःची आणि पाल्यांची माहिती एकदाच भरायची. त्यानंतर Google Classroom चे आमंत्रण तुमच्या gmail पत्त्यावर येईल.

    नोंदणीनंतर काय होते?

    1. फॉर्म भरा. पालकांचे (वडील/आई) आणि प्रत्येक पाल्याचे नाव, gmail, मोबाइल क्रमांक, तसेच मंडळाचा सभासद क्रमांक.
    2. ईमेल येईल. तुमचा क्रमांक (उदा. LOK-P-0001), पाल्यांचे क्रमांक आणि Classroom च्या लिंक तुमच्या gmail वर येतात. Spam फोल्डरही पाहा.
    3. Classroom मध्ये सामील व्हा. पालक पालक वर्गात आणि पाल्य पाल्य वर्गात, स्वतःच्या gmail खात्याने.
    4. सभासदत्वाची पडताळणी. सभासदत्वाच्या पावतीचा फोटो संयोजकांना WhatsApp वर खासगी संदेशात पाठवा.
    5. सत्राची लिंक. Zoom/Meet ची लिंक आणि वेळ Classroom मध्ये पाहा.

    पालक १ (नोंदणी करणारे)
    पालकाचे नाव लिहा.
    नाते निवडा.
    @gmail.com ने संपणारा योग्य पत्ता लिहा.
    १० अंकी भारतीय मोबाइल क्रमांक लिहा.
    मंडळाचा सभासद क्रमांक लिहा.
    पालक २ (पर्यायी)
    पाल्य

    पाल्याचे स्वतःचे gmail नसेल तर तो रकाना रिकामा ठेवा. आम्ही तुमच्याशी संपर्क करू.

    संमती

    ही माहिती फक्त या उपक्रमाच्या संचालनासाठी वापरली जाईल.

    Google Classroom मध्ये प्रवेश

    आम्ही तुमचा पासवर्ड कधीही मागत नाही आणि देत नाही. तुम्ही नोंदणीत दिलेल्या gmail खात्यानेच Classroom मध्ये जायचे आहे.

    पहिल्यांदा प्रवेश

    1. मोबाइल किंवा संगणकावर तुमच्या gmail मध्ये लॉगिन करा.
    2. ईमेलमधील पालक वर्ग / पाल्य वर्ग बटण दाबा आणि “Join” दाबा.
    3. लिंक चालत नसेल तर classroom.google.com वर जा, वर “+” दाबा, “Join class” निवडा आणि ईमेलमध्ये दिलेला वर्ग-कोड टाका.
    4. पालकांनी पालक वर्ग आणि पाल्यांनी पाल्य वर्ग यातच जायचे.

    तुमचे वर्ग

    वर्गाच्या लिंक नोंदणीनंतर तुमच्या ईमेलवर पाठवल्या जातात.

    सत्राची लिंक कुठे मिळेल?

    Classroom मध्ये वर्गाच्या “Stream” वर आणि Calendar मध्ये प्रत्येक सत्राची Zoom/Meet लिंक, वेळ आणि अभ्यास साहित्य असेल. व्हिडिओ आणि प्रश्नपत्रिकाही तेथेच.

    नेहमी विचारले जाणारे प्रश्न

    आम्हाला संस्कृत किंवा गीता अजिबात येत नाही, चालेल का?

    हो. सत्रे मूळ श्लोकांच्या मराठी अर्थापासून सुरू होतात. पूर्वतयारी लागत नाही.

    पाल्यासाठी वयाची अट आहे का?

    पाल्य वर्गाच्या वयोगटाबद्दल मंडळ आपल्याला Classroom मध्ये कळवेल. नोंदणी करताना इयत्ता नक्की लिहा.

    पाल्याचे स्वतःचे gmail नसेल तर?

    पाल्याचा gmail रकाना रिकामा ठेवा. पालकांच्या मदतीने खाते कसे तयार करायचे किंवा दुसरा पर्याय काय, हे आम्ही तुम्हाला कळवू.

    एखादे सत्र चुकले तर?

    लेक्चरचे व्हिडिओ Classroom मध्ये उपलब्ध असतील. तरीही उपस्थिती बंधनकारक असल्याने अपरिहार्य कारण असल्यास पुढे मार्गदर्शकांना आधी कळवा.

    परीक्षा कशी असते?

    बहुपर्यायी प्रश्नपत्रिका, स्वाध्याय पुस्तिकेवर आधारित. उद्देश आपण किती समजलो हे पाहणे आणि प्रशस्तीपत्रकासाठी पात्रता ठरवणे.

    प्रशस्तीपत्रक कोणाला आणि कोणत्या अटींवर मिळते?

    वडील, आई आणि पाल्य, प्रत्येकाला स्वतंत्र प्रशस्तीपत्रक मिळते. ते हस्तांतरणीय नाही. अटी: किमान ७०% उपस्थिती, परीक्षेत किमान ७०% गुण आणि मंडळाच्या सभासदत्वाची पडताळणी. प्रशस्तीपत्रकावर सहभागीचा नोंदणी क्रमांक असतो.

    आई आणि वडील दोघे सहभागी होऊ शकतात का?

    हो. फॉर्ममध्ये “पालक २” भरा. दोघांना स्वतंत्र क्रमांक मिळतो आणि दोघांनी स्वतःच्या gmail खात्याने पालक वर्गात सामील व्हायचे आहे.

    सभासदत्वाची पडताळणी कशी होते?

    फॉर्ममध्ये सभासद क्रमांक द्या. नोंदणीनंतर ईमेलमध्ये सांगितल्याप्रमाणे सभासदत्वाच्या पावतीचा फोटो संयोजकांना WhatsApp वर खासगी संदेशात पाठवा (ग्रुपमध्ये नको). पडताळणी झाल्यावर संयोजक ती नोंदवतात.

    २०२७ च्या गणेशोत्सवात कोण सहभागी होऊ शकते?

    परीक्षा उत्तम रीतीने उत्तीर्ण झालेले पालक आणि पाल्य, पहिल्या आणि दुसर्‍या अध्यायावरील चर्चा आणि वादविवाद सत्रात.

    वेळ आणि दिवस कोणता असेल?

    नोंदणी पूर्ण झाल्यावर, सर्वांच्या सोयीचा विचार करून Classroom मध्ये कळवला जाईल.